Name:

मी कोण ?ह्या प्रश्नाच उत्तर देण्याचा कित्येकदा निष्फळ प्रयत्न केला आहे. अहं च्या सुखासाठी दर वेळी हे असे नवीन ध्यासाने पछाडल्यागत धावत सुटायच हे आता सुरू आहे. एक जीवंत माणूस म्हणून संवेदनाचा हा ब्लॉग

Tuesday, November 14, 2006

गॅलपागस बेटे

गॅलपागस बेटे
पॅसिफिक महासागरात आढळणारा साधारण १३ मोठी बेटे आणि १००हून अधिक लहान बेटांचा एकत्रित समूह गॅलपागस ह्या नावाने ओळखला जातो. ही बेटे दूरवर समुद्रात एवढी एकाकी भासतात की जगात यापुढे कोणते वस्तीचे ठिकाणच नसावे. ह्या बेटांच्या छायाचित्राचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे. गालापागोस बेटांची कित्येक वैशिष्टे आहेत की ज्यामुळे ती बेटे चटकन लक्षात रहावीत. मोठे हौदाएवढे कासव, ड्रॅगनएवढे सरडे , चार डोळ्यांचे मासे ही त्यापैकी काही. आपले बूट फाटू शकतील एवढे धारधार दगडही याच बेटावर आढळतात. ह्यासर्वांमुळेच ही बेटे जगातील् इतर बेटांहून वेगळी आहेत. पॅसिफिक महासागरात साधारण ६००मैल दूर समुद्रात ह्या बेटांची टोके दिसतात. माणसाला कोड्यात टाकणारे आणि त्याची जिज्ञासा वाढवणारे ही बेटे आहेत यात शंका नाही.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उरलेले अवशेष त्या टोकांवर दिसले नाहीत तर नवलच. काटेरी निवडुंगाचे साम्राज्य ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उरलेल्या खडकांवर चहूकडे माजलेले दिसते. बेटांवर पाऊस पडतो त्या भागात दलदल निर्माण होते. ढगांनी काही उंच उंच पर्वत शिखरे झाकली आहेत की काय असा भासही निर्माण होतो. त्या ढगांमुळे झाडझुडपे असणारी जंगले अधिकच लपून बसतात.

बेटांवरील बराच भाग पहाताच असे वाटते की इथे जीवसृष्टी असणे शक्यच नाही. परंतु जगाच्या इतर कोणत्याही भागात न आढळणारे हजारो प्राणी ह्याच बेटावर किनाऱ्यालगत रेतीवर ते प्राणी बेटावरील दलदलीतून वाट काढतात आणि दगडांच्या सुळक्यावर चढून समुद्रात गडप होतात.
स्पॅनिश भाषेत अवाढव्य कासवाला गॅलापागोस म्हणतात . ह्या बेटांवर आढळणाऱ्या महाकाय कासवांमुळेच या बेटांना गॅलापागोस हे नाव प्राप्त झाले असावे. ह्या कासावाची पाठ एवढी मोठी असते की मोठाले बाथटब उलटे करून रांगेत ठेवले आहेत असाच भास होतो. ह्या कासवांचे कळपच्या कळप निवडुंगावर चरत समुद्रकिनाऱ्यावर फिरत असतात. कोणे एके काळी त्यांची संख्या खूप असली तरी मानवाने शिकार केली त्यामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. कित्येक प्राणी समूळ नष्ट झाले आहेत तर काहींना संरक्षणाची गरज आहे.

ह्या बेटांवर कधी गेलात आणि तुम्हाला जर ह्या कासवांचीच भिती वाटली तर महाकाय सरडे पाहून आपली भितीने गाळण उडेल यात शंका नाही. ह्या सरड्यांना एग्वाना म्हणतात. ड्रॅगन सारखे वा छोट्या डायनोसॉरसारखे दिसणारे हे सरडे या बेटावर मोठ्या संख्येने आढळतात. त्यांचे दात अणकुचीदार आणि बळकट असतात. त्यांच्या पंज्याची नखे धारधार असतात. या सरड्यांपैकी काही फक्त जमिनीवर तर काही फक्त समुद्रात राहातात. दिसायला प्रचंड मोठे आणि भितीदायक वाटतात पण ह्या बेटावर आढळणारी कासवे व सरडे माणसाला इजा करतीलच असे नाही. येथे पाण्यात व जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांनी खूप संख्येने मनुष्यप्राणी पाहिलेले नाही, त्यामुळेच की काय ती माणसाला पाहून बिचकतात.

बेटांभोवती खूप गार पाणी असले तरी बेटांवर गरम वारे वाहतात त्यामुळे थंड हवेच्या प्रदेशात आढळणारे पेन्ग्विन्स आणि सील येथे आढळतात तसेच उष्ण हवामानात राहणारे फ्लेमिंगोसुद्धा येथे दिसतात. मानवाव्यतिरिक्त आपले अन्न मिळवण्यासाठी इतर गोष्टींचा, आयुधांचा आधार घेणारे प्राणी खूप क्वचित आढळतात. या बेटांवर राहणारे फिंच काडीचा किंवा निवडुंगाच्या दांड्याचा उपयोग करुन लहान भेगेतून वा छोट्या जागेतून किडे बाहेर काढतात. कॉरमोरॅन्टस नावाचे पक्षी जमिनीवर वस्ती करतात पण भक्ष्य मिळवण्यासाठी पाण्यात पोहत जातात. त्यांना कधीही उडत नाहीत.

गॅलापागोस बेटांवर खलाशी व व्हेल माशाची शिकारी हे अधिक आढळून येत असत पण प्रसिद्ध संशोधक चार्ल्स डार्विनमुळे ह्या बेटांची माहिती जगाला मिळाली. संशोधन करत असताना डार्विनने ह्या बेटांचा शोध लावला. सुमारे १०० हून अधिक वर्षापुर्वी डार्विन या बेटांवर येऊन गेला. त्याला असे जाणवले की या बेटावर आढळणारे प्राणी जगाच्या इतर भागात कुठेही आढळत नाहीत. त्याला ह्या बेटावरील सरडे पोहताना दिसले, फिंच आपले अन्न मिळवण्यासाठी काडी वापरताना दिसला. एका बेटावर त्याला अगदी लहान मानेचे कासव जमिनीवरून आपले अन्न खाताना दिसले तर एका बेटावर लांब मान असणारे कासव आपले अन्न म्हणून उंच झाडाचा पालाच खात होते. ह्यासर्वाचा डार्विनला उत्क्रांतीचा सिद्धात मांडण्यास उपयोग झाला.

1 Comments:

Blogger deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

2:39 AM  

Post a Comment

<< Home