Name:

मी कोण ?ह्या प्रश्नाच उत्तर देण्याचा कित्येकदा निष्फळ प्रयत्न केला आहे. अहं च्या सुखासाठी दर वेळी हे असे नवीन ध्यासाने पछाडल्यागत धावत सुटायच हे आता सुरू आहे. एक जीवंत माणूस म्हणून संवेदनाचा हा ब्लॉग

Tuesday, November 14, 2006

पेंग्विन

रंगीबेरंगी पिसारा फुलवणारा मोर, झाडावर टकटक आवाज करत लाकूड तोडणारा सुतार पक्षी, एका पायावर झोपणारा हेरॉन, आपल्या चोचीलगतच्या पिशवीत एक मोठा मासा ठेवू शकणारा पेलिकन, वेगाने पंख हालवणारा हमिंगबर्ड ही काही वैविध्यपूर्ण पक्षांची उदाहरणे आहेत. या सर्वाहून अधिक लक्ष वेधणारा पक्षी म्हणजे पेंग्विन असे आम्हाला वाटते.

आश्चर्य म्हणजे या पेंग्विनला उडता येत नाही पण गोठवून टाकणाऱ्या गार पाण्यात वेगाने पोहता मात्र येते. पाण्यात खोलवर उडी मारता येते, पोहता येते आणि तेवढ्याच वेगाने पाण्यातून कित्येक फूट वर उडी मारता येते. एवढेच नाही तर इतर पक्ष्यांप्रमाणे वाळक्या काटक्या, पाने फक्त याचा वापर ते घरट्यासाठी करत नाहीत तर काही पेंग्विन पक्ष्यांचे घरटे दगडाचेसुद्धा असते. ह्या लेखात आपण पेंग्विनची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू.

एका जातीच्या पेंग्विन पक्ष्याची मादी अंडं देते आणि दूर समुद्रात निघून जाते. पेंग्विन जोडप्यातील नर आपल्या पायावर अंडं सांभाळून ठेवतो. त्याच्या पोटावरील एका पडद्यामुळे ह्या अंड्याला ऊब मिळते . अंड्यातून पिलू बाहेर यायच्यावेळी मादी परत येते आणि आपल्या चोचीने राखाडी रंगाच्या छोट्या पिलाला भरवते. त्या वेळी नर अन्नाच्या शोधार्थ निघतो.
पेंग्विनचे फिक्क्या रंगाचे पोट आणि गडद रंगाची पाठ त्यांचे शत्रूपासून संरक्षण करते. पोटाच्या फिकट रंगामुळे पोहताना ते पाण्यातील इतर प्राण्यांना चटकन दिसत नाहीत. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना त्यांची गडद रंगाची पाठ आणि पाण्याचा गडद रंग ह्यातील भेद कळत नाही.
पेंग्विन पक्ष्याची एक जात दगडांचे घरटे करते. एका दुसऱ्या जातीचा पेंग्विन एका वेळी दोन अंडी देतो, एक आकाराने मोठे असते तर दुसरे लहान. फक्त मोठ्या अंड्यातून पिलू बाहेर येते असे आढळले आहे. पेंग्विन मग दुसरे लहान आकाराचे अंडे का देतो याचा उलगडा मात्र झालेला नाही.

पेंग्विनच्या वसाहती
दक्षिण ध्रुवावर जेथे बराच काळ रात्र आणि कडाक्याची थंडी असते तिथे पेंग्विन आढळतात. उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात पेंग्विन आढळत नाहीत. या प्रदेशातील प्राणिसंग्रहालयात कधी कधी पेंग्विन दिसतात. उत्तर ध्रुवाच्या आर्टिक भागातसुद्धा पेंग्विन्स आढळत नाहीत.
गॅलापागोस पेंग्विन्स
गॅलापागोस पेंग्विन्स हे उष्ण हवामानाच्या प्रदेशात गॅलापागोस बेटांवर आढळणारे सर्वात लहान पेंग्विन्स आहेत. ह्यांच्या मानेवर एक बारीक पांढरी रेषा असते. त्याच्या पोटावर वरची बाजू खाली दिसणारा घोड्याच्या नालेच्या सारखा आकार असतो. ह्यांच्या पोटावरचे काळे ठिपके लहान असतात. त्यामुळे आपल्याला मॅगेलेनिक पेंग्विन्स व ह्यांच्यातील फरक समजतो. विषुववृत्ताजवळच्या गरम हवामानात आपल्या शरीराचे तापमान कमी ठेवण्याकरता हे पेंग्विन्स पाण्यात पोहतात व आपल्या अन्न शोधतात. आपल्या पाय भाजू नयेत म्हणून हे त्यांना आपल्या पंखांनी झाकतात. हे पेंग्विन्स मुख्यतः लहान आकाराचे मासे खातात. गॅलापागोस बेटे हीच सर्वात उत्तरेकडची पेंग्विनची वसाहत आहे.

अंटार्क्टिका भागात पेंग्विनच्या एम्परर, जेंटू, ऍडली व चिनस्ट्रॅप ह्या जाती आढळतात .

एम्परर पेंग्विन्स
त्यापैकी अंटार्क्टिका भागात राहणारे एम्परर पेंग्विन्स हे जगातील आकाराने सर्वात मोठे पेंग्विन्स आहेत. -६० डिग्री सेल्सियस एवढ्या कमी तापमानात हे पेंग्विन्स जगू शकतात. ते साधारणपणे ४ फूट उंच असून त्यांचे वजन अंदाजे ९० पौंड असते. त्यांचे सरासरी आयुष्य सर्वसाधारणपणे २० वर्षे असते. ४थ्या वर्षापासून हे पक्षी प्रजोत्पादन करू शकतात.
त्यांच्या शरीराचा आकार त्यांना ह्या थंड भागात जिवंत राहण्यास मदत करतो. ह्यांचे पंख आखूड असतात. त्यामुळे पाण्यात मोठे मासे पकडण्याकरता हे ९०० फुटांपर्यंत खोल उडी मारू शकतात. लेपर्डसीलपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते ताशी १०-१५ कि.मी. वेगाने पोहू शकतात.
एम्परर पेंग्विनची मादी एक मोठे अंडे देते. त्यानंतर मादी अन्नाच्या शोधार्थ दूर जाते. त्या अंड्याची काळजी अंदाजे ९ आठवडे नर घेतो. आपल्या पायावर ते अंडे घेऊन असे नर घोळक्याने किंवा कळप करून उबवत असतात. त्याच्या बाहेरील पंखाच्या आतल्या बाजूला ह्या पक्ष्यांना आणखी एक ऊबदार आवरण असते ज्यामुळे त्यांचा थंडीपासून बचाव होतो. अंड्याचे रक्षण करताना उपाशी राहिल्याने नराने वजन जवळजवळ अर्धे कमी होते. सह्या महिन्यात ह्यांच्या पिलांची पूर्ण वाढ होते. त्यावेळीच उन्हाळा सुरू होण्याच्या बेतात असतो. त्यावेळी हे सर्व पेंग्विन्स समुद्रात परत येतात. ह्या पक्ष्यांच्या शरीरावर तेलकटपणा जास्त असतो ज्यामुळे त्यांचे शरीर पाण्यात कोरडे राहते.
जेंटू पेंग्विन्स
जेंटू पेंग्विन्सचे घरटे वाळूच्या व खडकाळ किनाऱ्यावर असते. ते दगड, छोटे खडे, गवत, काड्या असे जे चटकन मिळेल ते साहित्य घेऊन आपले घरटे बांधतात. घरटे बांधण्याकरता एकमेकांचे दगड व उपयुक्त साहित्य हिसकावून घेण्यासाठी कित्येकदा ते आक्रमत होतात व प्रसंगी लढतातही. ह्यांची पिले साधारण ३० दिवस घरट्यात राहतात. अंदाजे १०० दिवसात त्यांची पूर्ण वाढ होते व ते स्वावलंबी होतात.

ऍडली पेंग्विन्स
ऍडली पेंग्विन्स हे ह्या खंडात राहणारे व सर्वात लहान आकार असणारे पेंग्विन्स आहेत.
ह्यांची उंची २८ इंच असून, वजन अंदाजे ४ किलो असते. हजारो पेंग्विन्सच्या कळपात हे खडकाळ किनाऱ्यावर आपले घरटे बांधतात . ह्या पेंग्विन्सची लांब शेपटी खूप ताठ असते. हे पक्षी चालत असताना शेपटीवरील पिसे जमिनीवर घासत जातात. ह्यांचे पोट पांढरे असून डोके आणि पाठ काळ्या रंगाची असते. ह्यांच्या डोळ्याभोवती एक पांढरे वर्तूळ असते. आपल्या पोटाने रेती, छोटे दगड व भुसभुशीत बर्फ बाजूला करत हे पेंग्विन्स वाट काढतात व एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात.
इतर पेंग्विनसप्रमाणे ह्यांच्यातील नर अंड्याचे रक्षण करतो, नर व मादी दोघे आळीपाळीने पिलासाठी अन्न शोधून आणतात. ऍडली पेंग्विन्सचे पिलू इतर पेंग्विन्सपेक्षा लवकर मोठे होते. पण आपल्या पिलाचे व घरट्याचे रक्षण असल्यामुळे ऍडली पेंग्विनना सर्वाधिक करावे लागते कारण लहान आकार असल्याने त्यांना बऱ्याच प्राण्यांपासून धोका असतो.
हे पेंग्विन्स पाणी पिण्याऐवजी बर्फ खातात.

चिनस्ट्रॅप पेंग्विन्स
चिनस्ट्रॅप पेंग्विन्स ह्यांची जगात सर्वाधिक संख्या आहे.
अंटार्क्टिका भागात चिनस्ट्रॅप पेंग्विन्स मोठ्या संख्येने आढळतात. ते प्रचंड मोठे कळप करून राहतात. बरेचदा हे समुद्रातील मोठ्या हिमनगांवरही राहतात. हे सर्वात धीट पेंग्विन्स आहेत आणि कित्येकदा इतर पेंग्विनशी लढतातही. हे आपल्या सहकाऱ्यांना ज्या कर्कश व विशिष्ट आवाजात साद घालतात त्यामुळे त्यांना 'स्टोन क्रॅकर ' असे नाव दिले आहे.

दक्षिण अमेरिकेतील पेंग्विन्सचिली आणि अर्जेंटिनाच्या किनाऱ्यांवर मॅगॅलॅनिक पेंग्विन्स व हम्बल्ट पेंग्विन्स आढळतात. याशिवाय फॉक्लंड बेटांवर जेंटू, रॉकहॉपर,मॅगॅलॅनिक आणि मॅकरोनी पेंग्विन्स आढळतात. यापैकी जेंटू पेंग्विन्सची माहिती आपण आधी करून घेतली आहे.
हम्बल्ट पेंग्विन्स-
हम्बल्ट पेंग्विन्सना पेरुवियन पेंग्विन्स म्हणतात. हे चिली आणि पेरूच्या किनाऱ्यावर व लगतच्या बेटांवर आढळतात. हम्बल्ट नावाच्या युरोपियन संशोधकाने ह्यांचा सर्वप्रथम शोध लावला म्हणून त्यांना त्याच नावाने ओळखतात. हम्बल्ट पेंग्विन्स आफ्रिकन पेंग्विनसारखे दिसतात पण हम्बल्ट आकाराने लहान असतात व त्यांचे पंख आफ्रिकन पेंग्विन्सपेक्षा मोठे असतात हा मुख्य फरक आहे.
मॅगेलॅनिक पेंग्विन्स
मॅगेलॅनिक पेंग्विन्स अर्जेंटिना, चिली व फॉक्लंडच्या खडकाळ किनाऱ्यावर राहतात. हे त्यातल्या त्यात उष्ण हवामानात राहणारे सर्वात मोठे पेंग्विन्स आहेत. त्यांच्या मानेवर एक रुंद काळा पट्टा असतो व त्यांच्या पोटावर एक उलट्या घोड्याच्या नालेच्या आकाराचा पट्टा असतो. त्याशिवाय त्यांच्या छातीवर बारीक ठिपके असतात. त्यांची उंची अंदाजे २७ इंच आणि वजन ४ किलो असते. ह्या पेंग्विनची मादी दोन अंडी देते आणि दोन्हीतून पिले बाहेर येतात. नर आणि मादी आळीपाळीने अंड्याचे रक्षण करतात व पिलांना भरवतात. गरम हवामानाच्या कालखंडात त्याच्या डोळ्याभोवती असणारी पिसे कमी होतात व त्या जागी फिकट गुलाबी पट्टा तयार होतो. हिवाळ्यात त्यांना पुन्हा पिसे पूर्वीसारखी वाढतात. रॉकहॉपर आणि मॅकरोनी पेंग्विन्सची माहिती आता करून घेऊ या.
रॉकहॉपर पेंग्विन्स-
अंटार्क्टिक भागातील बेटांवर हे पेंग्विन्स आढळतात. त्यांना हे नाव त्यांच्या दगडावर उड्या मारत जाण्याच्या सवयीमुळे दिले आहे. ते १८-२३ इंच उंच असतात व त्यांचे वजन अंदाजे ५ ते ८ पौंड असते. ( २-३ किलो). त्यांच्या डोक्यावर लक्षवेधक रंगाची पिसे असतात. हे 'क्रेस्टेड पेंग्विन्स' ह्या जातीचे पेंग्विन्स आहेत. ह्यांचा आवाज मोठा व कर्कश असतो. ते चटकन कुणावरही हल्ला करतात. नर आणि मादी आळीपाळीने १० - १० दिवस अंड्याचे रक्षण करतात. साधारण ३०-३२ दिवसात पिलू बाहेर येते.
मॅकॅरोनी पेंग्विन्स
या बेटांवर आढळणारे मॅकॅरोनी पेंग्विन्स आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका खंडाच्या टोकालगत तसेच अंटार्क्टिका भागातल्या बेटांवरही आढळतात. दगडांच्या फटीत किंवा चिखलात छोटे भोक पाडून मॅकॅरोनी पेंग्विन्स घरटे करतात. ते दोन अंडी घालतात. त्यापैकी आधी घातलेले अंडे आकाराने लहान असते. कित्येकदा त्यातून पिलू बाहेर येत नाही. एकमेकांशी लढण्यात ते फुटते. किंवा इतर प्राण्याने खाल्ल्यामुळे त्याचा नाश होतो. दुसरे अंडे आकाराने मोठे असून त्यातून पिलू बाहेर येते. अंडे उबवण्याचे काम नर आणि मादी दोघे आळीपाळीने दीर्घ काळ करतात. : ३३ ते ३७ दिवसात ह्या अंड्यातून पिलू बाहेर येते. २३ ते २५ दिवस नर नवजात पिलाची काळजी घेतो. त्यावेळी मादी पिलाकरता अन्न आणते. पिलू ६० ते ७० दिवसांचे झाले की पिलाचे पंख तोपर्यंत बळकट होतात आणि ते स्वतः अन्न मिळवू शकते. तोपर्यंत त्याचे माता पिता त्या पिलाची काळजी घेतात आणि दर एक दोन दिवसांनी त्याला अन्न भरवतात

0 Comments:

Post a Comment

<< Home