Name:

मी कोण ?ह्या प्रश्नाच उत्तर देण्याचा कित्येकदा निष्फळ प्रयत्न केला आहे. अहं च्या सुखासाठी दर वेळी हे असे नवीन ध्यासाने पछाडल्यागत धावत सुटायच हे आता सुरू आहे. एक जीवंत माणूस म्हणून संवेदनाचा हा ब्लॉग

Monday, August 28, 2006

भाषाविकास - एक जीवशास्त्रीय आढावा- भाग २
उत्क्रांती व भाषाविकास
स्वसंरक्षणासाठी व शिकारीसाठी लागणारे कोणतेही प्रभावी साधन नसणारा मनुष्यप्राणी खरे तर केव्हाच नामशेष झाला असता पण जगण्यासाठी नवीन गोष्टी तो शिकत गेला; प्रथम उजव्या हाताचे स्नायू वापरून दगडाची शस्त्रे बनवणे व त्यांनी शिकार करणे. शिकार करून प्रामुख्याने तो आपले पोट भरायचा. ताशी तीस ते चाळीस मैल अशा वेगाने धावू शकणाऱ्या प्राण्याची शिकार करायची म्हणून त्याला एकमेकांशी सहकार्याने राहण्याची गरज निर्माण झाली. कळपाने राहणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या सहकार्यातून संवाद निर्मिती झाली. इतर मानवांशी त्याचा ध्वनीसंवाद सुरू झाला. इतर प्राण्यांमध्ये एकमेकांना असे संदेश देणे आढळतेच. ह्या मानवाच्या संवादातून पुढे भाषेचे ध्वनी व शब्द जन्माला आले, भाषेचा जन्म झाला. उजव्या हाताच्या छोट्या स्नायूंना आदेश देणारी व वाणीची मज्जाकेंद्रे उत्क्रांतीमध्ये मेंदूत एकाच वेळी निर्माण झाली आहेत म्हणून ती संलग्न आहेत.
ह्याबदलांबरोबर आदिमानवाचा मेंदू आकाराने वाढू लागला. मेंदूच्या बाह्य भागाची फार मोठी वाढ झाली. उत्क्रांतीमध्ये या मेंदूला नवमेंदू असे म्हणतात. इतर सर्व प्राण्यांमध्ये मेंदूचे आकारमान व शरीराचे आकारमान यांच्या प्रमाणाचा आकडा अगदी कमी असतो. पण मानवाच्या बाबतीत तो आकडा बराच मोठा आहे. शरीराच्या प्रमाणात या नवमेंदूचा आकार तिप्पट आहे. कोणत्याही प्राण्याला मानवाएवढा नवमेंदू नाही. हया नवमेंदूमध्ये वाणी व भाषा सर्वप्रथम जन्माला आली. लेखी भाषा जरी फक्त साडेपाच हजार वर्षापूर्वी सुरू झाली तरी लाख दोन लाख वर्षापासून मानव अशा वाणीच्या माध्यमातून संवाद साधतो आहे.
उजव्या हाताच्या स्नायूंना प्रेरणा देणारी मज्जाकेंद्रे त्याच्या डाव्या मेंदूत निर्माण झाली. त्याच केंद्राभोवती जवळपास वाणीकेद्र निर्माण झाले. हाताच्या स्नायूंना आदेश देणारे केंद्र व तोंडाच्या स्नायूंना आदेश देणारे केंद्र यांचे आदिकालापासून नाते आहे. उजव्या बाजू अर्धांगवायुने निकामी झालेल्या माणसाची वाचा ह्याचमुळे कधी कधी जाते किंवा तिला आघात पोहोचतो असे आपल्याला आढळते.
मानवी मेंदूची रचना व कार्य
मानवी मेंदू दोन अर्धगोलांचा बनलेला आहे, डावा व उजवा. ह्या दोन अर्धगोलांच्या बाह्य करड्या भागात माणसाची उच्चस्तरीय बौद्धिक कार्ये चालतात. १८६४ मध्ये पॉल बोका नावाच्या एका शास्त्रज्ञाने दाखवले की मेंदूच्या एका विशिष्ट भागाला इजा झाली तर त्या व्यक्तीचे उच्चार व व्याकरण दूषित बनतात पण ध्वनिग्रहण व उद्बोधन शाबूत राहाते. ह्या भागाला 'बोकाज् एरिया 'असे नाव पडले. १८७४ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ कार्ल वेर्निक याने दाखवून दिले की मेंदूच्या कपाळालगतच्या भागाला म्हणजे 'टेंपोरल लोबला' इजा झाली की शब्दाचे अर्थ व वाणीचा प्रवाह दोन्ही विस्कळीत होतात. या भागाला 'वर्निक प्रदेश' असे नाव मिळाले आहे..
मेंदूची उच्च उद्बोधन कार्ये पार पाडणारी केंद्रे खूप सलग व एकमेकात मिळलेली असतात. कार्याप्रमाणे मेंदूचे घटक आपण वेगळे करू शकत नाही पण मेंदूला इजा झालेल्या व्यक्तींच्या कार्यात दिसणाऱ्या कमतरतेतून आपण विविध भागांचे कार्य अजमावू शकतो पण निश्चित असे अनुमान काढू शकत नाही. तरीही काही गोष्टी आता सर्वमान्य आहेत. मेंदूच्या पृष्ठभागावरील एक मोठी चीर त्याचे दोन भाग पाडते, पुढचा आणि मागचा. मागच्या भागात संवेदनांचे ग्रहण, उद्बोधन होते तर पुढच्या भागात शरीराला आदेश देणारी कार्ये होतात. तळाशी असणाऱ्या टेंपोरल लोब प्रदेशात ध्वनिग्रहण व उद् बोधन होते.
मानवी मेंदूच्या कार्याचा एक मूलभूत नियम आहे- मेंदूकडे येणारे संवेदनांचे प्रवाह व मेंदूकडून इंद्रियांकडे जाणारे आदेश डाव्या व उजव्या बाजू ओलांडतात. शरीराच्या डाव्या बाजूकडून येणाऱ्या संवेदना उजव्या मेंदूत व डाव्या मेंदूतून निघणारे आदेश उजव्या बाजूच्या स्नायूंकडे पोहोचतात. संवेदना व आदेशांचे वहन करणारे तंतू एकमेकांना ओलांडून विरुद्ध बाजूला जातात. तरीही डाव्या व उजव्या अर्धगोलाचे काम सारखे नाही. उजव्या हाताने प्रामुख्याने कामे करणाऱ्या माणसात मज्जासंस्थेवर मेंदूच्या डाव्या अर्धगोलाचे वर्चस्व असते असा एक समज होता पण आता दोन्ही अर्धगोलात काही ठराविक कार्येच केली जातात असे समजले जाते.
भाषा, गणित ह्यांसारखी बौद्धिक कार्ये डाव्या अर्धगोलातच होतात, तेव्हा डाव्या अर्धगोलाचे वर्चस्व नसले तरी मेंदूचा डावा अर्धगोल विशेष प्रभावी असणे हे मानवी मज्जासंस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. हा प्रभाव उत्खननातून अनेक पुराव्यातून सिद्ध झाला आहे. हा लेख अधिक मोठा करण्यापेक्षा डाव्या व उजव्या मेंदूत होणारी उच्चस्तरीय बौद्धिक कार्याची विभागणी व भाषेचे बाजूकरण आपण पुढील भागात पाहूया.

0 Comments:

Post a Comment

<< Home