Name:

मी कोण ?ह्या प्रश्नाच उत्तर देण्याचा कित्येकदा निष्फळ प्रयत्न केला आहे. अहं च्या सुखासाठी दर वेळी हे असे नवीन ध्यासाने पछाडल्यागत धावत सुटायच हे आता सुरू आहे. एक जीवंत माणूस म्हणून संवेदनाचा हा ब्लॉग

Monday, August 28, 2006

याआधीच्या लेखात आपण भाषेच्या नैसर्गिक विकासाचे टप्पे व भाषेचा प्राथमिक विकास हा उत्क्रांतीचा वारसा आहे ते पाहिले. या अनुषंगाने मेंदूच्या रचनेचा आढावा घेतला. आता मानवाच्या मेंदूच्या कोणत्या भागात आणखी कोणती कार्ये चालतात ते पाहू. या सर्वांचा आपल्याला भाषेचे बाजूकरण कसे होते, केव्हा होते , डावखुऱ्या माणसात त्याचा मेंदू कसे कार्य करतो हे समजवून घेण्यास मदत होईल.
मेंदूच्या अर्धगोलांत कार्याची विभागणी
मानवाचा डावा मेंदू अधिक प्रबल आहे हे सत्य असले तरी डाव्या आणि उजव्या मेंदूत उच्चस्तरीय बौद्धिक कार्याची विभागणी झाली आहे - विश्लेषण, उपलब्ध माहितीच्या आधारे निश्चित अशी कारणमीमांसा(analysis and deduction), एका वेळी एक आणि एकापाठोपाठ एक असे साखळी पद्धतीने विचार(serial thinking) ही कार्ये मेंदूच्या डाव्या अर्धगोलात होतात. समस्यांची तर्कशुद्ध बौद्धिक मीमांसा सुद्धा डाव्या अर्धगोलात होते.
उपलब्ध माहितीचे संकलन, थोड्या माहितीच्या आधारे बऱ्याच मोठ्या अंदाजाची बांधणी , वेगवेगळ्या विचारधारांचा एकाच वेळी पाठपुरावा(parallel thinking) ही कार्ये उजव्या अर्धगोलात होतात. स्वाभाविक अंतःप्रेरणा व मनोभावना यांच्या आधारे एखादा प्रश्न सोडवणे, एखाद्या गोष्टीची चिकित्सा व उद्बोधन ही कार्ये मेंदूच्या उजव्या अर्धगोलात होतात.
थोडक्यात आपण ज्याला बौद्धिक म्हणतो ते मेंदूचे व्यापार डाव्या अर्धगोलात होतात. उजव्या हाताने कामे करणाऱ्या माणसाचा डावा अर्धगोल अधिक प्रभावी असतो. गणित, गहन शास्त्रीय प्रश्नांवर विचार , वाणीचे उद्बोधन , साहित्यलेखन ही डाव्या अर्धगोलाची मक्तेदारी आहे. ज्या व्यक्ती गणितात प्राविण्य मिळवतात त्या उत्तम साहित्यिकही होऊ शकतात वा उत्तम साहित्यिक गणितात प्राविण्य मिळवू शकतात असेही म्हणता येईल, कारण ही दोन्ही कामे डाव्या अर्धगोलाची आहेत. कित्येकदा आवड, परिस्थिती व इतर काही कारणांनी हे प्रत्यक्षात शक्य होत नाही त्यामुळे मला भाषा जास्त येते, गणित कसे येणार असे गैरसमज सुद्धा निर्माण होतात.
जेव्हा माणूस बारकाव्यांचा, सूक्ष्म तपशीलांचा विचार करतो तेव्हा तो डावा अर्धगोल वापरतो. समीरकरणे सोडवताना डावा अर्धगोल वापरतो. पण माणूस जेव्हा व्यापक ,ढोबळ स्वरूपाची वैचारिक क्रिया करतो तेव्हा त्याच्या मेंदूचा उजवा अर्धगोल कार्यरत असतो. प्रदूषण वाढत राहिले तर मानवावर त्याचा काय परिणाम होईल असा व्यापक विचार माणसाच्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलात चालतो.
मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये संदेशांचे दळवळण सुरु असते. अनेक वेळा काही कारणाने डावा मेंदू निकामी झाला तर त्याचे काम उजवा भाग करतो असे सुद्धा आढळले आहे.
मेंदूच्या उजव्या आणि डाव्या अर्धगोलांच्या कार्याची तुलना पुढील कोष्टकात केली आहे. जगण्यासाठी, संरक्षणासाठी लागणारे कौशल्य हे डाव्या मेंदूत रूजले आहे असे अनुमान त्यावरून काढता येईल.
मेंदूचा डावा अर्धगोल मेंदूचा उजवा अर्धगोल
खोल विचार, विश्लेषणशक्ती ढोबळ , स्थूलमानाने विचार
गणिते, शास्त्रे संगीत, रंग, चित्रे
कालाधिष्ठीत विचार स्थलाधिष्ठीत विचार
वाणीच्या ध्वनींचे बोधन निःशब्द अभिव्यक्ती
बौद्धिक प्रक्रिया भावनिक प्रकिया
भाषेचे बाजूकरण(lateralization of language)
अगदी अनादिकालापासून उजव्या हाताने माणूस शस्त्रे बनवायला शिकला व सहकाऱ्यांशी ध्वनिसंवाद करू लागला. तेव्हापासून उजवा हाताच्या स्नायूंचे कार्य व वाणीकार्य डाव्या मेंदूत बिंबले आहे. पण हे वाणीचे बाजूकरण जन्मतः झालेले नसते. ते ठराविक वयात सुरू होते. साधारण हे बाजूकरण सहाव्या वर्षी सुरू होते व अंदाजे बाराव्या तेराव्या वर्षी पूर्ण होते असे संशोधकांचे म्हणणे आहे. बाजूकरणाविषयी एकमत असले तरी ते केव्हा पूर्ण होते याविषयी एकमत नाही. हे बाजूकरण एकदा पूर्ण झाले की नवीन भाषा शिकणे बरेच कठीण होते. हे पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही भाषांविषयी आढळले आहे. जसजसे हे बाजूकरण डाव्या मेंदूत पक्के होते तसतसे इतर भाषांचे, ध्वनींचे, उच्चाराचे विविध पर्याय मेंदूतून नाहीसे होतात. मग दुसऱ्या भाषेचे उच्चार सहज प्राप्त होत नाहीत ते शिकावे लागतात. परभाषिकांना आपल्या भाषेतील व आपल्याला परभाषेतील उच्चार हुबेहूब करता येत नाहीत असा एकंदरीत अनुभव आहे. म्हणूनच दुसरी भाषा शिकण्याची सुरूवात लहानपणी व लवकरात लवकर करायची असते. वाणीचे शुद्ध उच्चार लहानपणी मेंदूत ठ्सणे का आवश्यक आहे ते आपल्या लक्षात आले असेलच. ध्वनीभांडार कमी असणारी भाषा जे बोलतात त्या माणसांना इतर भाषा शिकणे अधिक अवघड जाते. उदाहरण म्हणून स्पॅनिश भाषीक लोकांना इंग्रजी शिकणे अवघड जाते असे आढळते.
भाषातज्ज्ञ वाणीचे उच्चार (phonotics,) उच्चारसंहिता (phonology), भाषेचे व्याकरण? (syntax) , शब्दसंग्रह ? (lexicon), भाषार्थ?(semantices) आणि भाषाप्रयोग ?( pragmatics) असे पाच भाग करतात. ह्यात पहिले तीन सहाव्या वर्षाअगोदर मेंदूत बिंबवायला हवेत. मग शाळकरी वयात हस्ताक्षर, शुद्धलेखन, वाड्मयीन भाषा, निःशब्द अभिव्यक्ती यांचा अधिक विकास होतो.
डावखुरा माणूस व भाषा
वर केलेली सर्व विधाने उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसाला लागू होतात. मग डावखुऱ्या माणसाचे काय बरे? आरशातल्या प्रतिमेप्रमाणे त्याचे वाणीकार्य उजव्या अर्धगोलात होते का? नाही. याचे कारण असे की बहुतेक डावखुरी माणसे दोन्ही हाताचा वापर करत असतात. त्यांच्याही मेंदूचा डावा अर्धगोलच अधिक प्रबल असतो. जी १-२ % माणसे खरी डावखुरी असतात, सर्व कामे डाव्या हातानेच करतात, त्यांचा मात्र उजवा अर्धगोल प्रबल असतो. त्यांच्या वाणीचे बाजूकरण उजव्या अर्धगोलात होते. खऱ्याखुऱ्या डावखुऱ्या मुलाला जर आईवडिलांनी सक्तीने उजवा हात वापरायला लावला तर त्याच्या वाणीत तोतरेपणा निर्माण होऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.
द्वैभाषिक मेंदू व भाषांचे बाजूकरण
हातांचा वापर व वाणी यांच्या केंद्रांची संलग्नता व त्यांचे अतूट नाते हा उत्क्रांतीने मानवाला दिलेला वारसा आहे. उत्क्रांतीमध्ये मानवाला दोन भाषा शिकण्याची गरज निर्माण झाली नाही. तेव्हा दोन भाषा शिकणे हे नैसर्गिक नाही. काही कारणाने सक्तीने दोन भाषा शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीमुळे दोन भाषा एकदम शिकण्यानेच ही मुले मागे पडतात असा समज बराच काळ होता पण आता तो गेल्या दशकातील संशोधनाने दूर झाला आहे.
जेव्हा लहान मूल सहाव्या वर्षापूर्वीच दोन भाषांच्या प्रभावाखाली असते तेव्हा ते अगदी नैसर्गिकरित्या दोन भाषा अवगत करते. दोन भाषा कानावर पडल्यामुळे त्यांच्या मेंदूत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. बोलताना काही वेळा एका भाषेत मूल दुसऱ्या भाषेतला शब्द वापरते पण कालांतराने सुशिक्षित पालकांच्या मदतीने मुलाची प्रगती जास्त होते. अशा द्वैभाषिक मुलाच्या मेंदूचे बाजूकरण कसे होते? त्याची पहिली भाषा ही बहुधा ज्याच्या सहवासात अधिक काळ मूल राहते ती होते आणि ती डाव्या अर्धगोलात ठसते. तर दुसरी भाषा उजव्या मेंदूत केंद्रित होते असा अनुभव आहे. पण याबद्दल तज्ज्ञांमध्ये अजून एकमत नाही.द्वैभाषिकात दोन भाषांचे ज्ञान मेंदूत दोन वेगवेगळ्या ठिकाणी साठवले जाते. अशा व्यक्तीमध्ये भाषाज्ञान व क्षमता यांची केंद्रे उजवीकडे स्थायी झाल्याने डाव्या अर्धगोलाची बरचशी कामे उजवा अर्धगोल स्वीकारतो. उजवा मेंदू डाव्याचे विश्लेषणात्मक काम स्वीकारतो व स्वतःचे कामही जास्त चांगले करतो असे आढळून येते.
जी मुले सहाव्या वर्षापूर्वी दोन भाषा चांगल्या आत्मसात करतात ती जास्त चांगले शैक्षणिक यश मिळवतात असा आता अनुभव आहे. कनेडियन मानसतज्ज्ञ वॉलेस लॅम्बर्ट याच्या संशोधनातून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी द्विभाषिक मेले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात.
दुसऱ्या भाषेचे ज्ञान आणि ती भाषा बोलण्याची क्षमता यांचे स्थायीकरण उजव्या अर्धगोलात होते त्यामुळे तो अधिक प्रज्वलित होतो व उच्च बौद्धिक क्षमतेत भर टाकतो असा अर्ध सुद्धा द्विभाषिक मुलांवर केलेल्या संशोधनातून निघतो आहे. म्हणजे उजवा अर्धगोल डाव्या गोलाचेही काम करतो आणि उजव्याचेही .असेच निष्कर्ष जगाच्या इतर बहुभाषिक देशात झालेल्या संशोधनानंतर निघाले आहेत.
जागतिकीकरणाचे परिणाम
आजवर जगावर डाव्या मेंदूचे वर्चस्व होते असे म्हणायला हरकत नाही. शाळा कॉलेजात, आर्थिक व्यवहारात यश मिळवून देणारी विश्लेषणक्षम बुद्धिमत्ता ही डाव्या अर्धगोलाची मक्तेदारी. पण आता केवळ तर्कशुद्ध विचार करुन काम करता येणे याबरोबर विविध भाषा येणे हेसुद्धा जरूरीचे आहे. जागतिकीकरणाने जगात झपाट्याने बदल होत आहेत. जगभरातील तर्कशुद्ध विचार करून होणारी कामे, तसेच उद्योगधंद्यांची सर्विस ऑपरेशन्स, ग्राहकसेवा केंद्रे अशी कामे कमी खर्चात जगातील पूर्वेकडचे देश आनंदाने करायला तयार आहेत. भारत आणि चीन या स्पर्धेत पुढे आहेत. थोडक्यात सांगायचे तर इंग्रजी बोलू शकणारा भारत देश पश्चिमेकडची बौद्धिक कामे कमी खर्चात करू शकतो तर पश्चिमेची अवजड कारखानदारी चीनकडे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भविष्यात असे व्यवसाय निर्माण होतील की ज्यासाठी मानवाला उजवा व डावा अशा मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांकडून कामे करून घेण्याची गरज निर्माण होईल. उजवा अर्धगोल जरी मेंदूच्या डाव्या अर्धगोलाच्या प्रभावाखाली असला तरी अगदी लहानपणीच मुलांना दोन भाषा शिकवून त्यात पारंगत केले तर दुसरी भाषा उजव्या अर्धगोलात स्थीर होईल. ती भाषा शिकताना मेंदूचा उजवा अर्धगोल जागृत होईल, हा जैविक नियम आहे. त्यामुळे भविष्यात अशी द्वैभाषिक मुले अधिक चांगले व्यावसायिक यश संपादन करू शकतील.
काही चित्रे
टेंपोराल लोब
मानवाचा मेंदू - उजवा व डावा अर्धगोल

आभार
language introductory Readings, Ed, Virginia Clark et al 1994
Higher Congnitive Functions, डॅनियल ट्रेनेल, ह्युमन प्रेस २०००
रिवेंज ऑफ द राइट ब्रेन- डॅनियल पिंक, वायर्ड मॅगऍझिन , फेब-२००५
द इफेक्ट्स ऑफ बायलिंग्विझम ऑन द इन्डिव्हिज्युअल-लॅम्बार्ट वॅलेस ई, न्युयोर्क अकॅडमिक प्रेस, १९७७
लॅन्वेज डेव्हलपमेंट- अ बायोलॉजिकल रिव्हियू- विजय सबनीस
विकिपिडिया
वेटिंग

1 Comments:

Blogger Gayatri said...

उत्तम लेखमाला. विशेषत: संदर्भसूचीबद्दल आभार.
जिज्ञासा शमविणारे /वाढविणारे असेच लेख वाचायला मिळतील अशी आशा.
ध्वनिभांडार कमी असणाऱ्या भाषेचे उदाहरण म्हणून आपण स्पॅनिश भाषेचा उल्लेख केला आहे. ध्वनिभांडार सर्वाधिक असलेली भाषा कोणती याबद्दल माहिती मिळू शकेल का?

2:24 AM  

Post a Comment

<< Home