Name:

मी कोण ?ह्या प्रश्नाच उत्तर देण्याचा कित्येकदा निष्फळ प्रयत्न केला आहे. अहं च्या सुखासाठी दर वेळी हे असे नवीन ध्यासाने पछाडल्यागत धावत सुटायच हे आता सुरू आहे. एक जीवंत माणूस म्हणून संवेदनाचा हा ब्लॉग

Monday, August 28, 2006

भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग १
मूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठराविक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध ध्वनींना प्रतिसाद मिळू शकतो हे सुद्धा अनुभले असेल. थोडक्यात सांगायचे तर एवढ्या लहान वयातील अशा शिक्षित वागणुकीने बाळ ऐकते त्याचे त्याचा मेंदू उद्बोधन करत असतो.
मानवी मेंदूत होणारा वाणीचा विकास हा दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक उपजत आणि दुसरे म्हणजे शिकून अंगी बाणवलेल्या वागणुकीच्या मिश्रणातून. जगातील सर्व लहान बाळे एक जैविक आणि दुसरा जनुकीय असा प्रोग्रम घेऊन जन्माला येतात. गर्भावस्थेत असल्यापासूनच बाळाला आईचा आवाज परिचित असतो असे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे.
ह्या काळात एकापेक्षा अधिक भाषा बोलता येतात असे कित्येक आहेत, किंबहुना जागतिकीकरणाने निर्माण झालेली ती एक गरज आहे असे म्हणावे लागेल. भारतीयांना किमान तीन भाषा येत असतात असे म्हणूया. त्याशिवाय मातृभाषा एक व दुसऱ्या प्रांतात राहणे, भिन्न भाषिक जोडीदार, परदेशात निवास तर कधी आवड अशा कारणांनी काही भारतीयांना त्यापेक्षा अधिक भाषा येत असतात. आशियातील कित्येक देशात असे आढळते तसेच असे अनुमान आशियाबाहेरील देशांबद्दल आता काढता येईल. ह्या सर्व भाषा शिकणे का शक्य होते आणि त्यावेळी मेंदू कसे काम करतो हे सर्व जाणून घेणे अतिशय कुतुहलाचे आहे. त्याची माहिती आपण खूप तपशीलात न जाता करून घेऊ या.
भाषा- एक जैविक प्रकिया
बाळाचे मन हे एक कोरी पाटी असते आणि आपल्या पालकांचे विविध उच्चार ऐकून मूल भाषा शिकते असा जुना समज बराच काळ होता. परंतू १९६७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ लेनबर्ग ह्याने काही जे संशोधन केले त्यामुळे भाषा ही आईवडिलांनी दिलेली देणगी नसून ती मुलाच्या मेंदूने सक्रीय राहून अवगत केली आहे असे उघड झाले. बालमनात होणारा भाषेचा विकास ही एक उपजत जैविक, जनुकीय प्रवृत्ती आहे याला पुरावा आहे आणि तो पुढील प्रमाणे
बालकात भाषाप्राप्तिचा एक नैसर्गिक कालावधी असतो त्या काळातच नैसर्गिकरित्या भाषाप्राप्ती होऊ शकते. त्याला कोणतीही भाषा अपवाद नाही.
भाषेचा उदय हा कोणताही जाणीवपूर्वक निर्णय नसतो.
कोणत्याही बाह्य घटनेचा पडसाद वा त्यावर प्रतिसाद म्हणून भाषेची सुरुवात होत नाही तर ती प्रेरणा आतून येते. भोवतालचे वाणीसमृद्ध वातावरण फक्त पोषक असते.
वाणीचा विकास बालकांमध्ये कोणत्याही औपचारिक साधनेने होत नाही.
भाषा टप्प्या टप्प्याने विकसित होते आणि हे टप्पे सर्व जातीच्या वंशाच्या व वर्णाच्या माणसात ठराविक वयानुसारच व्यक्त होतात.
सर्व मानवी बालके बसणे, पोटावर पडून रांगणे, दुडके चालणे व नंतर चालणे असे विकासाचे टप्पे ठराविक वेळी ठराविकपणे गाठतात असे आढळून आले आहे. मूल बसायला लागते तेव्हा आवाजाचा चढ उतार करू लागते, चालायला लागण्यापूर्वी एक एक शब्द उच्च्चारायला शिकते. शब्दापासून व्याकरणाचे नियम सांभाळून वाक्य तयार करणे व हात नि बोटाचे लिहिण्यास लागणारे सुसंधान / एकत्रितपणा एकाच वेळी साध्य होऊ लागते.
नवजात बालकाचा डोक्याचा घेर साधारण साडेतेरा इंच असतो तर एका वर्षाच्या मुलाचा एकोणीस इंच व पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या डोक्याचा घेर बावीस इंच असतो. त्यामुळे पहिल्या एका वर्षात माणसाच्या मेंदूची सर्वात जास्त वाढ होते असे स्पष्ट होते.
भाषेच्या विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेतः
जन्म- रडणे
जन्म- ६ आठवडे- गळ्यातून स्वरध्वनी काढणे
जन्मानंतर सहा महिने- तोंडातून आवाज काढणे व व्यंजननिर्मिती
जन्मानंतर ८ महिने- ध्वनीच्या लकबी ओळखणे, नक्कल करणे
जन्मानंतर एक वर्ष - दा दा, मा मा असे एकाक्षरी शद्ब उच्चारता येणे
जन्मानंतर १८ महिने- एकापेक्षा अधिक अक्षरी शब्द उच्चारता येणे , शब्दसंग्रह साधारणपणे- २०-५० शब्द
जन्मानंतर दोन वर्ष + ३ महिने- क्रियापद वापरून तीन शब्दांचे वाक्य बनवणे.
जन्मानंतर ३० महिने- शब्दसंग्रह साधारणपणे ३०० शब्द
जन्मानंतर तीन वर्षे- प्रश्न विचारणे, नकारार्थी वाक्ये, बालगीते
मुलाच्या वाणीचा व्याकरणविकासही टप्प्याने होतो.
भाषाप्रभुत्व नैसर्गिकरित्या दोन ते बारा ह्या कालखंडात प्राप्त होते. भाषाप्राप्तीचा वेग ,क्षमता व वय याचा आलेख काढला तर साधारण टेकडीच्या आकाराचा दिसतो. सहाव्या वर्षी ही क्षमता सर्वात जास्त असून साधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत जवळजवळ सर्वात कमीच असते. सहाव्या वर्षी सर्वात जास्त म्हणजे १०० क्षमता असे मानले तर त्यानुसार आलेख काढला तर पुढीलप्रमाणे दिसेल.
सेक्स हार्मोन्स रक्तात घोळायला लागले की मेंदूचा लवचिकपणा कमी होत जातो व नैसर्गिकरित्या प्राप्त झालेले भाषासंस्कार पक्के ठसतात याच वेळी नैसर्गिक भाषाप्राप्ती थांबते. म्हणूनच साधारण बाराव्या तेराव्या वर्षानंतर कोणतीही भाषा खऱ्या अर्थाने प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. सहाव्या वर्षी भाषेची, वाणीची मज्जाकेंद्रे दक्षिणहस्त मुलांच्या(उजवा हात प्रामुख्याने वापरणारी मुले) मेंदूतील डाव्या अर्धगोलात स्थिर होऊ लागतात. ह्या प्रकियेला आपण बाजुकरण (लॅटेरलॅझेशन) असे म्हणू.
एकापेक्षा अधिक भाषा बोलणाऱ्या लोकांचा मेंदू कसा काम करतो ते पुढील भागात पाहू. त्याकरता उत्क्रांती, मेंदू आणि भाषा यांचा परस्पर संबंध याचाही आढावा घेऊ या.

0 Comments:

Post a Comment

<< Home